करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढरित्या अपहरण
ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. १७ : गणेशोत्सवाच्या धामधुमीत घरात बाप्पाची पूजा करुन बाहेर पडलेला तरुण संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील करबुडे येथे घडली. सर्व नातेवाईक, सासरवाडी व मित्रांकडे शोध घेऊनही कोणताही ठावठिकाणा न लागल्याने तरुणाच्या वडिलांना ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रफुल्ल प्रकाश तांबे (वय २७, रा. करबुडे, रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार करबुडे-मुळगाव येथील रहिवासी प्रफुल्ल तांबे हा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातील गणपतीची विधीवत पूजा आटोपून पावणे बाराच्या सुमारास ‘मी निवळी येथे जाऊन येतो’ असे सांगून घरातून निघाला, मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबियांनी तातडीने प्रफुल्लच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच त्यांच्या सासरवाडीत सर्वत्र चौकशी केली मात्र त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.अखेर कोणीतरी अज्ञाताने गुप्तपणे व बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने वडिल प्रकाश गोपाळ तांबे (वय ६०) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस प्रफुल्ल तांबे यांचा मोबाईल सीडीआर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून शोध घेत आहेत.