मांजरे येथील २२ वर्षीय अथर्व देसाई याचा खाडीत बुडून मृत्यू
दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून मृतदेह बाहेर
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईहून मांजरे, कळकदेकोंड येथे गावी आलेल्या अथर्व राजेश देसाई वय वर्ष २२ या तरुणाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अथर्वने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अथर्व हा निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई आणि वेदांत मनीष देसाई यांच्यासोबत जांभळी बंदर येथे गेला होता. यावेळी खाडीत ओहोटी सुरू होती. पाण्याचा प्रवाह वेगवान असताना अथर्व पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
अथर्व पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्रांनी वाडीत येऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी खाडीत शोध सुरू केला. मात्र अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे रात्री शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल अरुण वानरे , कॉन्स्टेबल मिथुन म्हस्कर आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने होड्यांद्वारे रात्री शोधमोहीम राबवली.
अथर्वचा शोध न लागल्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक पाचारण करण्यात आले. मंगळवारी एनडीआरएफच्या दोन पथकांनी खाडी परिसरात शोधमोहीम राबवली.
मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाला अथर्वचा मृतदेह आढळून आला. पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईक च्या ताब्यात रात्री उशिरा देण्यात आला.
दरम्यान, पावसाळ्यात नदी, खाडी आणि समुद्रातील पाण्याची पातळी व प्रवाहात बदल होत असतो. भरती-ओहोटीच्या वेळी प्रवाहाचा वेग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी तसेच पोहता येत नसल्यास पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे. विशेषतः गणेशोत्सवासाठी मुंबई व अन्य शहरांतून गावी येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.