नवजात बालकाचा डेरवण येथे उपचारादरम्यान मृत्यू
दापोली : दापोली तालुक्यातील गव्हे येथील एक दिवसाच्या नवजात पुरुष जातीच्या बालकाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गव्हे येथील वैष्णवी संकेत आग्रे यांची पटवर्धन हॉस्पिटल, गिम्हवणे येथे प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला होता. मात्र, जन्मापासूनच बाळ रडत नव्हते तसेच त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी १० सप्टेंबर रोजी रात्री ११.४८ वाजता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सावर्डे पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाल्यानंतर दापोली पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.