नमन आणि जाकडी कलेला शासन दरबारी राजाश्रय; रत्नागिरीत आज ‘कृतज्ञता सोहळा’
रत्नागिरी:-
कोकणच्या संस्कृतीचे वैभव असलेल्या ‘नमन’ आणि ‘जाकडी’ या पारंपरिक लोककलांना शासन दरबारी अधिकृत राजाश्रय मिळाल्याबद्दल रत्नागिरीत एका भव्य ‘कृतज्ञता सोहळा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक व दैदिप्यमान सोहळा बुधवार, दिनांक १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता थिबा पॅलेस रोड येथील ‘जयेश मंगल कार्यालय’ येथे संपन्न होणार आहे. कोकणची ही कला टिकवून ठेवणाऱ्या आणि तिला राजाश्रय मिळवून देणाऱ्या शासनाचे आभार मानण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे आयोजन नमन लोककला रत्नागिरी मातृसंस्था, कोकण नमन कलामंच रत्नागिरी तालुका संस्था आणि कलगीतुरा समाज उन्नती मंडळ रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, ‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकणच्या मातीतील या लोककलांचा शासकीय पातळीवर गौरव झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कलाकारांमध्ये आणि कलाप्रेमींमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहमंत्री योगेश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम आणि लांजा-राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोकणच्या सांस्कृतिक चळवळीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या ऐतिहासिक व दैदिप्यमान सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व नागरिक, रसिक प्रेक्षक आणि नमन-जाकडी कलाकारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.