एकाच दिवशी सहा जणांना सर्पदंश
रत्नागिरी : पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतीकामांना वेग आला असतानाच, रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी वेगवेगळ्या भागांत शेतात काम करणाऱ्या सहा जणांना सर्पदंश झाला.
सुदैवाने, सर्व बाधितांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे अनर्थ टळला असून, सर्वांचे प्राण वाचले आहेत. गोळप येथील गिरीश कृष्णा मयेकर (वय ५२), लांजा तालुक्यातील खानवली येथील संजीवनी जयवंत गुरव (६५), रत्नागिरीतील मीरा पांडुरंग होरंबे (६५), कोतवडे येथील स्नेहलता एकनाथ धुमक (५०), गुहागर तालुक्यातील नरवण येथील वृद्ध महिला लक्ष्मी दत्तात्रय देवूडकर (८७) आणि बसणी येथील तरुण आराध्य महेश नेवरेकर (२०) यांचा समावेश आहे. सर्पदंशाच्या या घटना घडताच संबंधित नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. सर्व बाधितांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतीही वेळ न गमावता या सर्वांवर तत्काळ आपत्कालीन उपचार सुरू केले.