जिल्ह्यातील रेशन दुकाने राहणार बंद
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचाही राज्यव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा
रत्नागिरी:
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-पॉस प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा सर्व्हर बिघाड निर्माण झाल्यामुळे अन्नधान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सर्व्हर अतिशय संथ चालणे, वारंवार बंद पडणे, बायोमेट्रिक प्रमाणीकरण न होणे आणि सुरू केलेले व्यवहार अपूर्ण राहणे यांसारख्या तांत्रिक समस्यांमुळे शिधापत्रिकाधारक आणि रास्त भाव दुकानदारांना नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक- मालक संघटनेने राज्य फेडरेशनच्या आव्हानाला पूर्ण पाठिंबा दर्शवत दिनांक ०७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून एन आय सी च्या माध्यमातून ई-पॉस मशिनवर इंटरनेट सर्व्हरची सेवा काही महिन्यांपासून सतत चालू-बंद होत असल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार कळवूनही काहीही सुधारणा होत नसल्यामुळे, राज्य फेडरेशनच्या वतीने दिनांक २१/०८/२०२६ रोजी लेखी स्वरूपात निवेदन देऊन चर्चा केली असता याबाबत आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. या सर्व प्रकारामुळे रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक- मालक संघटनेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये फेडरेशनच्या वतीने केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातून पूर्णतः पाठिंबा देत सोमवार, दि. ०७ सप्टेंबर रोजी ई-पॉस मशीन दिवसभर बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एन आय सी कडून मिळणाऱ्या इंटरनेटच्या आणि सर्व्हरच्या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे ग्राहकांचे व्यवहार वेळेत पूर्ण होत नाहीत, परिणामी दैनंदिन अन्नधान्य वितरण्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सर्व्हर बंद असल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना तासनतास दुकानांसमोर ताटकळत उभे राहावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. दुसरीकडे, दुकानांसमोर होणाऱ्या लांबच लांब रांगा आणि वेळेवर माल न मिळाल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात विनाकारण वाद होऊन दुकानदारांची प्रतिमा मलीन होत आहे. या सर्व प्रकारामुळे दुकानदारांचा वीज, इंटरनेट, कागदपत्रे व इतर दुकान व्यवस्थापनाचा खर्च विनाकारण वाढत चालला आहे.
या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, यासाठी फेडरेशन आणि रत्नागिरी संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एन आय सी सेवा पुरवठादार आणि तांत्रिक अभियंत्यांनी ई-पॉस मशीनवरील इंटरनेट व सर्व्हरची क्षमता वाढवून वितरणाच्या सुरुवातीच्या दिवसांत अखंडित सेवा द्यावी, तसेच तक्रार क्रमांक देणारी स्वतंत्र राज्यस्तरीय हेल्पडेस्क यंत्रणा तातडीने सुरू करून प्रत्येक तक्रारीचे कालबद्ध पद्धतीने निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व्हर बंद किंवा संथ असल्यास त्याची अधिकृत माहिती वृत्तपत्रे, दूरदर्शन, सोशल मीडिया आणि स्थानिक पुरवठा कार्यालयामार्फत प्रसिद्ध करावी, जेणेकरून ग्राहकांचा वेळ व प्रवास खर्च वाचेल. तांत्रिक बिघाडामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरण न झाल्यास पात्र लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत म्हणून तात्काळ सुरक्षित पर्याय किंवा ऑफलाइन वितरणाची व्यवस्था लागू करावी. सर्व्हर बंद किंवा गंभीरमत्या बाधित राहिल्यास तितक्या दिवसांची मुदत मासिक अन्नधान्य वितरणासाठी आपोआप वाढवून देण्यात यावी. नेटवर्क समस्या किंवा तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिलेल्या व्यवहारांसाठी रास्त भाव दुकानदारांना जबाबदार धरू नये, त्यांना नोटिसा देणे किंवा दंड आकारणे अन्यायकारक ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे दुकानदारांच्या पुढील महिन्याच्या नियतनावार, कमिशनवर किंवा प्राधिकारपत्रावर कोणतीही नकारात्मक कारवाई करू नये आणि झालेला अतिरिक्त खर्च व आर्थिक नुकसानीबाबत योग्य तो भरपाई किंवा संरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही रेटून धरण्यात आली आहे.
जर या तातडीच्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत, तर निदर्शनास आणून दिलेल्या समस्यांचा निषेध म्हणून आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दिनांक ०७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक आपापल्या दुकानांमधील ई-पॉस मशीन दिवसभर बंद ठेवून या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा उद्देश ग्राहकांना त्रास देणे हा नसून, तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त झालेल्या जनतेला व दुकानदारांना न्याय मिळवून देणे हा आहे, त्यामुळे शासनाने तातडीने यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा आणि धान्य वितरण सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे, अशी आक्रमक भूमिका रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक / मालक संघटनेने घेतली आहे.