समुद्रात भरकटलेली ‘धनलक्ष्मी’ नौकेसह ८ खलाशी सुखरूप किनाऱ्यावर
स्थानिक मच्छीमार व संघटनांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
रत्नागिरी:
मुंबईहून मासेमारीसाठी गेलेली आणि तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात भरकटलेली ‘धनलक्ष्मी’ ही नौका अखेर रत्नागिरीत सुखरूप पोहोचली आहे. स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बोटीवरील ८ खलाशांचे प्राण वाचले असून, या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईची ‘धनलक्ष्मी’ नौका समुद्रात असताना तिच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. बोट बंद पडल्यामुळे आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने ही बोट समुद्राच्या लाटांवर भरकटत रत्नागिरी परिसराजवळ येऊन पोहोचली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही बोट समुद्रातच अडकून पडली होती. बोट मालक व खलाशांनी मदतीसाठी कोस्टगार्ड आणि मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, मत्स्य विभागाने हा संदेश एका स्थानिक मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केला.
स्थानिक कार्यकर्त्यांची रात्रभर शोधमोहीम
व्हॉट्सॲपवरील संदेश मिळताच ‘कोकण संघटक’चे ताहीर मुल्ला यांनी तातडीने मदतीची हाक ओळखून पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रात्रभर समुद्रात शोध आणि मदत मोहीम राबवली. अखेर रविवारी सकाळी खलाशांना बोटीचे इंजिन पुन्हा सुरू करण्यात यश आले आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने ही बोट रत्नागिरीच्या मिरकरवाडा जेट्टीवर सुरक्षितपणे आणण्यात आली. जेट्टीवर पोहोचल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी खलाशांच्या जेवणाची व पाण्याची सोय करत त्यांना धीर दिला.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
तीन दिवस खलाशांचा जीव धोक्यात असतानाही कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाने तातडीने प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. “तीन दिवस ८ खलाशांचा जीव समुद्रात धोक्यात होता. अशा वेळी कोस्टगार्ड आणि मत्स्य विभागाने तात्काळ पेट्रोलिंग करून मदतीसाठी धावून जाणे गरजेचे होते. परंतु, स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच हे प्राण वाचू शकले,” अशी प्रतिक्रिया सागर सम्राट मच्छीमार बचाव व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जनाबभाई कारभारी यांनी दिली आहे.