चिपळूण पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ महाकाय वृक्ष कोसळला
पाच ते सहा दुचाकींचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
चिपळूण : शहरातील पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळील महाकाय वृक्ष शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या वेळी पाऊस सुरू असल्याने परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे वृक्षाखाली कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षांपासून उभा असलेला हा महाकाय वृक्ष अचानक कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी दररोज तालुकाभरातून शासकीय कामांसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच आवारात अनेक वाहने पार्क करण्यात येतात. त्यामुळे ही घटना गर्दीच्या वेळी घडली असती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या वृक्षाच्या बुंध्याजवळ पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांकडून वारंवार कचरा जाळला जात होता. त्यामुळे वृक्षाचा बुंधा आतून जळून कमकुवत झाला होता आणि हा वृक्ष धोकादायक बनल्याची चर्चा परिसरात होती.
दरम्यान, डॉ. अशोक सकपाळ यांनी हा वृक्ष धोकादायक असल्याने तो तातडीने तोडण्यात यावा, अशी लेखी मागणी गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे केल्याचा दावा केला आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बापू काणे, कैसर देसाई, समीर कोवळे यांनीही कचरा जळू नका असे सांगितले होते. यावर कार्यवाही झाली असती तर आज घडलेली दुर्घटना टाळता आली असती अशी चर्चा सुरु आहे.
घटना घडल्यानंतर पंचायत समितीचे सदस्य विनोद झगडे आणि सुभाष जाधव यांनी तत्काळ सर्वांना एकत्र करून वृक्ष हटविण्याची मोहीम सुरू केली. काही युवकांनीही पुढाकार घेत झाडाचे तुकडे करून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे काही वेळात वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ परिसरात गंभीर वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता पंचायत समिती परिसरातील इतर धोकादायक वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.