परशुराम घाटातील गॅबियन वॉल धोक्यात
पहिल्याच मुसळधार पावसात महामार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
चिपळूण: जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होण्याची परंपरा असली, तरी यंदाचा संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाची चिंता वाढली होती. अखेर जूनच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावत गेल्या दोन-चार दिवसांपासून चिपळूण तालुक्यात जोरदार बरसात सुरू केली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असतानाच दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या गॅबियन वॉलला तडे गेल्याने याच्या सुरक्षिततेवर पहिल्याच मुसळधार पावसाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात आली. घाट परिसरातील गाव आणि महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी येथे गॅबियन वॉल उभारण्यात आली होती. मात्र, सततच्या पावसामुळे या भिंतीच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाला असून भविष्यात भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही पहिल्याच जोरदार पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत आणि प्रशासनाच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अजून संपूर्ण पावसाळा बाकी असताना ही स्थिती चिंताजनक मानली जात असून, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असल्याने येथील सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही. त्यामुळे “परशुराम घाट वाहतुकीच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सुरक्षित कधी होणार?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.