श्री छ. शिवाजी हायस्कूलमध्ये लोककला प्रात्यक्षिक कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ
लेझीम, झाकडी अन् पोवाड्याच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी जपली लोककलेची परंपरा
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे संक्रमण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मातीत रुजलेल्या लोककलांविषयी आवड, अभिरुची आणि अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील लोककला प्रात्यक्षिक कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव आणि प्रबोधन शाहीरी कलापथक संस्था, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि विविध लोककलांच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाने करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रबोधन शाहीरी कलापथक संस्था, इचलकरंजीचे सचिव श्री प्रशांत पोवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेचे शिक्षक एन. व्ही. जाधव सर यांच्या हस्ते श्री. प्रशांत पोवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत पोवार यांनी आधुनिकतेच्या प्रवाहात या लोककला लोप पावू नयेत, त्यांचे जतन व संवर्धन व्हावे आणि नव्या पिढीने त्या आत्मसात कराव्यात, यासाठी शालेय स्तरावर अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोककलेची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध लोककलांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कला शिक्षक श्री जाधव सर यांनी लोककला प्रात्यक्षिक कार्यशाळेचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा अविभाज्य भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम, झाकडी आणि शाहिरी पोवाडा या विविध लोककलांचे दमदार व प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक कला आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने शाळा आणि प्रबोधन शाहीरी कलापथक संस्था, इचलकरंजी यांनी संयुक्तपणे घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमास श्री गजानन बागडी, सौ. शुभांगी बागडी, सौ. शमिका साळवी, सौ. आरती कोळंबेकर तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितूत मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार श्री सावंत सर यांनी मानले.