रस्त्याच्या साईडपट्टीवर ट्रक उतरविणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रक चालवून कळझोंडी फाटा क्र. २ येथे ट्रक रस्त्याच्या साईडपट्टीवर उतरविणाऱ्या चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू भाऊराव फड (वय ३७, रा. कीर्तीपुर उसवाड. ता. मठा जि. जालना) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरिल कळझोंडी फाटा क्र.२ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित राजू फड याने आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-४६ बीयु ७१०१) ही निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे चालवून वळणावर रस्त्याच्या उजव्या बाजूला जावून ट्रकची पुढील दोन्ही चाक रस्त्याच्या साईडपट्टीवर खाली उतरवली. या प्रकरणी पोलिस शिपाई रवींद्र आठवले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.