तुकाराम मुंढे यांच्या रत्नागिरी दौऱ्याची चर्चासुरु होताच व्यावसायिकांमध्ये लगबग वाढली
रत्नागिरी :- राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुढील आठवड्यात कोकण दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, रत्नागिरी व चिपळूण येथील अन्न सुरक्षा व्यवस्थेचा ते आढावा घेणार असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, फास्टफूड व चायनीज सेंटरची संख्या मोठी आहे. या ठिकाणी स्वच्छता, खाद्यतेलाचा वापर, खाद्यरंग, अजिनोमोटो, मुदतबाह्य पदार्थ तसेच स्वयंपाकघराच्या स्वच्छतेबाबत ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संभाव्य दौऱ्यात अचानक तपासण्या, अन्नपदार्थांचे नमुने आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आयुक्त मुंढे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू होताच व्यावसायिकांमध्येही लगबग वाढली आहे. आस्थापनांची स्वच्छता, परवाने व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासली जात आहे. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन रत्नागिरीतील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते.