बालमूर्तिकारांतील गणेशमूर्ती साकारण्याची अनोखी स्पर्धा
“कांचन डिजिटल” तर्फे आयोजन
बालमूर्तिकारांतील कलागुणांना वाव देण्याचा उद्देश
रत्नागिरी (प्रतिनिधी) -रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या कांचन डिजिटलतर्फे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बालमूर्तिकारांसाठी गणेशमूर्ती साकारण्याच्या एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी जयेश मंगल पार्क-थिबा पॅलेस रोड सभागृहात घेण्यात येणार आहे.
कांचन डिजिटलतर्फे गतवर्षी गणेशोत्सवानिमित्त या स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन केले होते. पहिल्याच वर्षी या स्पर्धेला बालमूर्तिकारांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे का? अशी विचारणा बालमूर्तिकारांच्या पालकांतर्फे कांचन डिजिटलकडे करण्यात येऊ लागल्याने यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बालमूर्तिकारांतील कलागुणांना, हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी गतवर्षीपेक्षा अधिक मोठ्या स्तरावर ही स्पर्धा घेण्याचे कांचन डिजिटलतर्फे योजण्यात आले आहे.
- स्पर्धेबाबतचे नियम व अटी खालीलप्रमाणे…
1) स्पर्धा केवळ “5 वी ते 8 वी” इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
2) जयेश मंगल पार्क-थिबा पॅलेस रोड सभागृहात रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत स्पर्धा होईल.
3) आयोजकांतर्फे बालमूर्तिकारांना शाडूमाती मोफत पुरविण्यात येईल.
4) मूर्ती घडविताना लागणाऱ्या वृत्तपत्र कागद, कपडा वगैरे साहित्य विद्यार्थ्यांसोबत पालकांनी पाठवावे.
5) मूर्तीचे कोरीवकाम करण्यासाठी लागणारी कोरणी सामान विद्यार्थ्यांनी आणावे.
6) बालमूर्तिकारांनी आपल्या संकल्पनेतील सुबक मूर्ती हस्तकौशल्यातून साकारायची आहे.
7) स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक ओंकार संजय पाटणकर या मूर्तिकारांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
8) स्पर्धेनंतर तज्ज्ञ परीक्षकांतर्फे परीक्षण करून आकर्षक आणि अनोख्या मूर्तींना पारितोषिक देण्यात येणार आहे.
9) स्पर्धेचा परीक्षकांचा निकाल अंतिम राहिल, त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
10) स्पर्धेतील मुलांसाठी अल्पभाराची व्यवस्था करण्यात येणार आहे
11) स्पर्धेसाठी नावनोंदणी अनिवार्य असून नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट आहे. ( नोंदणीसाठी नंबर व्हाट्सअप नंबर 9422576736, 8087296110 )
तरी गतवर्षीप्रमाणेच बालमूर्तिकारांनी यंदाही या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजक कांचन डिजिटलचे संचालक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे. गतवर्षीप्रमाणेच शहरातील विविध शाळांतील मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन आणि आपल्या कलाशिक्षकांचे सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे.
“पालकांनाही उत्स्फूर्त सहभागी होण्याची संधी”
गेल्यावर्षी स्पर्धेत उदंड सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी आम्हालाही आमच्या कलेला वाव देण्याची, तसेच मातीकाम करण्याची ईच्छा असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार यंदा पालकांची ईच्छापूर्ती करून त्यांना उत्स्फूर्त गणेशमूर्ती घडविण्यासाठी सहभागी होण्याची संधी कांचन डिजिटलतर्फे देण्यात येणार आहे. स्पर्धेठिकाणी पालकांनी उत्स्फूर्त मातीकाम करता येणार आहे.