तुरळ येथे इनोव्हा कारची दोन वाहनांना धडक
७८ वर्षीय चालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमेश्वर, दि. ६ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे भरधाव इनोव्हा कारने समोरून येणाऱ्या एसयूव्ही आणि एका उभ्या असलेल्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, वाहन हयगयीने व बेदरकारपणे चालवल्याप्रकरणी ७८ वर्षीय चालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई ते गोवा हायवे रोडवरील मौजे तुरळ (ता. संगमेश्वर) येथे हा अपघात घडला. आरोपी जिक्रिया इस्माईल मोडक (वय ७८, रा. कडवई मुस्लिम मोहल्ला, ता. संगमेश्वर) हे आपली इनोव्हा गाडी (क्र. एम.एच. ०८ झेड १९१८) ही गोवा ते मुंबई महामार्गाने संगमेश्वरहून कडवईच्या दिशेने चालवून नेत होते. मौजे तुरळ येथे आल्यावर त्यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपली गाडी हयगयीने, बेदरकारपणे, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवली.
यादरम्यान त्यांच्या गाडीने समोरून मुंबई बाजूकडून येणाऱ्या महिंद्रा एक्सयूव्ही गाडीला (क्र. जी.जे. ०५ आर.डी. ७२६६) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अनियंत्रित झालेली इनोव्हा गाडी बाजूलाच कच्च्या रस्त्यावर उभ्या असलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलला (क्र. एम.एच. ०८ ए.डब्ल्यू. ०३२३) जाऊन धडकली. या अपघातामुळे तिन्ही वाहनांच्या नुकसानीस चालक कारणीभूत ठरला.
मोटर अपघात रजी नंबर १५/२०२६ च्या चौकशीअंती ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:२१ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी पोलीस हवालदार उमेश विलास गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.