जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
3 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असून शुक्रवारी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी मुसळधार पावसासह वादळी वारे देखील हजेरी लावतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर 3 ऑगस्ट पर्यंत कायम राहणार असून यामुळे मासेमारीचा नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. पाऊस गायब होऊन उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर सर्वाधिक दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी नोंदवलेल्या पावसाच्या आकडेवारीत मागील चोवीस तासात 177 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 16 हजार 213 मिमी पाऊस पडला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवार 31 जुलै रोजी जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर 3 ऑगस्ट पर्यंत कायम राहण्याचा अंदाज असून किनारपट्टी भागात पावसाचा आणि वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने 1 ऑगस्ट पासून मासेमारीच्या नव्या हंगामाची तयारी करण्यात गुंतलेल्या मच्छीमारांचा मात्र पुरता हिरमोड झाला आहे. किनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारीचा नवा हंगाम लांबण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक असल्याने जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत असून रत्नागिरीत देखील काजळी नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदी देखील पूर्ण क्षमतेने वाहत आहे. पावसाचा जोर वाढल्यास नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.