रत्नागिरीतील हरवलेले १०३ मोबाईल नागरिकांना परत
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आधुनिक तांत्रिक यंत्रणेच्या प्रभावी वापरातून हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल १०३ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र चंद्रकिशोर मीना यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नितीन दातार बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महाडुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारींचा पाठपुरावा केला. सी.ई.आय.आर. या आधुनिक प्रणालीचा प्रभावी वापर करून मोबाईलचा माग काढण्यात आला. या मोहिमेमुळे १०३ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
कार्यक्रमात मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी रत्नागिरी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून सी.ई.आय.आर.
प्रणालीवर नोंदणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडल्यास विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन दातार बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महाडुनी, जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच मोबाईल परत मिळालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले असून, भविष्यातही अशाच प्रभावी उपक्रमांद्वारे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.