
तळवडे येथे घरावर वीज कोसळून महिला जखमी
लांजाः– लांजा तालुक्यातील तळवडे, आसगे, कुरचुंब गावात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने झोडपून काढले. गुरुवारी रात्रौ तळवडे गावी प्रभाकर बाबुराब पाटोळे यांच्या घरावर वीज कोसळून त्यांची पत्नी सौ प्रिया पाटोळे जखमी झाली तर घरातील वीज उपकरणं जळून सुमारे 48 हजार रुपये नुकसान झाले आहे अन्य घरातील व्यक्तींना सुदैवाने कोणतेही दुखापत झाली नाही.
गुरुवारी रात्री लांजा परिसरासह आसगे, तळवडे गावात विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. तळवडे वरची वाडी येथे प्रभाकर पाटोळे यांचे कुटूंब पत्नी दोन मुलगे, सून, नातवंडे सह झोपी गेले होते. अचानक घरात विजेचा लोळ आला आणि क्षणात घरातील वीज उपकरणे जळाली. झोपेतून घाबरून उठलेल्या पाटोळे कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली. प्रभाकर यांच्या पत्नीला विजेचा धक्का लागून जखमी झाल्या. वीज पडल्याचे समजल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तलाठी अरुण वंजारे यांनी नुकसानीचा पंचनामा केला.