
भाट्ये समुद्र किनारी सापडली ऑलिव्ह रिडले कासवांची १४१ अंडी
रत्नागिरी : कासवांचा विणीचा हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या किनारपट्टींवर कासवांची घरटी आढळून येत आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी, मालगुंड पाठोपाठ आता प्रथमच भाट्ये समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची १४१ अंडी सापडली आहेत. ही अंडी गावखडी येथे वनविभागामार्फत संरक्षित करण्यात आली आहेत.
सकाळी भाट्ये येथील पूर्वा भाटकर या किनाऱ्यावर चालण्यासाठी गेल्या असता, त्यांना कासवाने काढलेला हा खड्डा दिसून आला. त्यांनी ही बाब तातडीने आपला पती स्वप्निल भाटकर यांना सांगितली. त्यांनी ही बाब जितेंद्र शिंदे यांना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी मिताली कुबल यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे प्रभू साबणे, मिताली कुबल व गावडे हे भाट्ये झरीविनायक मंदिरानजीक दाखल झाले.
रत्नागिरी तालुक्यात गावखडी व मालगुंड समुद्रकिनारी यंदाही कासवांची घरटी आढळली आहेत. दोन्ही ठिकाणी वनविभागाने अंडी संरक्षित करण्यासाठी जाळ्यांचे कुंपण तयार केले आहे. कासवांची अंडी ही वासावरून कुत्रे, कोल्हे ओळखतात. खड्डा खणून अंडी बाहेर काढतात व फस्त करतात. त्यामुळेच या अंड्यांचे संरक्षण करून, त्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत देखरेख ठेवावी लागते.
गावखडी येथील कासव मित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील हेही भाट्ये येथे पोहोचले. त्यानंतर कासवाची अंडी बाहेर काढण्यात आली. एकूण १४१ अंडी घरटयामध्ये आढळली. भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर सापडलेले हे पहिलेच घरटे आहे. कासांची ही अंडी गावखडी येथील किना-यावर संरक्षित करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘कासव मित्र’ बनण्यासाठी ग्रामस्थ सकारात्मक भाट्ये किनारा व इझरी विनायक मंदिरामुळे भाट्ये हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. याठिकाणी कासवाचे पहिलेच घरटे सापडले असून, या किनाऱ्यावर कासवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने व्यवस्था झाल्यास पर्यटक वाढीसाठीही फायदा होईल. याठिकाणी झरी विनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते ‘कासव मित्र’ बनण्यास तयार असून, वनविभागाने त्याबाबत प्रशिक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ स्वप्नील भाटकर यांनी दिली.