
कोकणात प्रथमच आढळली एलियनशी साधर्म्य साधणारी कातळशिल्पे
दापोली : कोकणातील राजापूर, मंडणगड आदी ठिकाणी सापडलेल्या कातळशिल्पांच्या पश्चात आता दापोली तालुक्यात चक्क एलियनशी साधर्म्य साधणारी कातळशिल्पे आढळून आली आहेत. या एलियनच्या कातळशिल्पांमुळे कोकणच्या अभ्यासकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असून कोकणच्या निर्मितीबाबतही संशोधकांसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. शिवाय या दुर्मीळ कातळशिल्पांमुळे कोकण पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे मोठ्या प्रमाणात कातळशिल्पे सापडून आली आहेत. युनेस्कोनेही याची दखल घेतली आहे. शिवाय नुकतीच मंडणगड येथेही कातळशिल्पे खासगी जागेत आढळली आहेत. आता दापोली तालुक्यातील उंबर्ले व सडवे गावाच्या हद्दीवर गाढव कातळ अशी सातबाराला नोंद असलेल्या ठिकाणी एलियनशी तंतोतंत साधर्म्य साथणारी कातळशिल्पे सापडली आहेत. ही कातळशिल्पे सुमारे ६ ते ७ हजार वर्षापूर्वीची असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवली आहे. यामुळे कोकण निर्मितीच्या अभ्यासकांना या एलियनशी साधर्म्य साधणाऱ्या कातळशिल्पांची मदत होणार आहे.
दापोली तालुक्याच्या दक्षिणेला दाभोळ रोडवर साधारण ६ ते ७ कि.मी. अंतरावर उंबर्ले गाव आहे. या गावाच्या थोडे अलिकडे दापोलीच्या बाजूला दाभोळकडे जाताना डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता गेला आहे. या कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यावर साधारण १ किलोमीटर अंतरावर खासगी जागा सुरू होते. या खासगी जागेतून जागा मालकानी त्यांच्या जागेत जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता धुळीने माखलेला असला तरी थेट कातळशिल्पापर्यंत जातो. हा रस्ता जिथे संपतो, त्याच्यापुढे साधारण १०० मीटर अंतरावर गाढवाचे कातळ म्हणून भाग आहे. याचठिकाणी ही कातळशिल्पे कोरली आहेत. येथे दक्षिण ते उत्तर थोडा उताराचा हा भाग असून येथे सर्वत्र कातळ आहे. याच्या शेजारी एक चिऱ्याची खाणही आहे.
एलियनशी साधर्म्य साधणारी कातळशिल्पे
ही कातळशिल्पे माझ्या जागेच्या बाजूलाच आहेत. आम्ही गेली कित्येक दिवस ही कातळशिल्पे पाहत असून त्यांचा अभ्यासही सुरु आहे. या कातळशिल्पांचे जतन व्हावे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. या कातळशिल्पामध्ये एलियनची प्रतिकृती स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय या प्रतिकृतीच्या डोक्यावर एक अँटेना व त्याला शेवटी २ टोकेही दिसत आहेत. यामुळे हे कातळशिल्प एलियनचे असावे, याला पुष्टी मिळते, अशी माहिती येथील दापोली अर्बन बैंक सीनियर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी बोलताना दिली.