
संगलट मोहल्ला येथे बंद घर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास
खेड:- तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील बंद घर फोडून चोरट्याने १ लाख २६ हजार ८२५ रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना ५ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घर बंद असताना घडली आहे.
या प्रकरणी कय्युम महेमुद नाडकर यांनी शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संगलट मोहल्ला येथील कय्युम महेमुद नाडकर याच्या घरात चोरट्याने मागील बाजूने प्रवेश केला. घराच्या मागील बाजूला ठेवलेले लाकडी पॅनल काढून आत ठेवलेले शेगडीचे चार बर्नल, शेगडीचे रेग्युलेटर, तांब्याचे मोठे तपेले, लहान तपेले, तांब्याचे ३४ लहान हंडे, १२ हजाराची तांब्याची लहान-मोठी भांडी, ७ हजार ३०० रुपयांची ५ तपेली, तीस हजार रुपयांच्या २५ गोधड्या, १० हजार ७२५ रुपयांची सहा मोठी भांडी, असा एकूण १ लाख २६ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.