
आशा व गटप्रवर्तक महिला १२ जानेवारीपासून बेमुदत संपावर
रत्नागिरी :राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्याविषयीचे शासन निर्णय अद्यापही काढलेले नाहीत. त्यामुळे आॅनलाईन कामबंदचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे 12 जानेवारीपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने (आयटक) घेतला आहे. या तयारीसाठी 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हापरिषदेसमोर आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांनी वाटाघाटीसाठी कृति समितीसोबत बैठक घेतली आणि आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट २००० रूपये, आशांना ७ हजार रूपये मानधन वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10 हजार रूपये वाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना मोबदला देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ न केल्यामुळे संप पुढे लांबला. १० नोव्हेंबरला आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. तसेच आभा कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवाय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे कामे केले. संप स्थगित होवुन दीड महिना झाला, तरिही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपुरच्या हिवाळी अधिकवेशनात १८ डिसेंबर रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २९ डिसेंबर २०२३ पासुन ऑनलाईनच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे 12 जानेवारी 2024 पासून बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.