
कोमसापच्या राजापूर संमेलनाचा ग्रंथदिंडीने प्रारंभ
राजापूर:- पारंपरिक ढोलताशाचा गजर आणि वाद्याच्या नादावर सादरीकरण करणारी लेझीम पथके यांनी सजलेल्या राजापूर शहर आणि ओणी बाजारपेठ परिसरामध्ये सोमवारी काढलेल्या ग्रंथदिंडीने ओणी (ता. राजापूर) येथे आयोजित केलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला.
या ग्रंथदिंडीतील पालखीसोबत बारा बलुतेदार, संत तुकाराम, सर्वसामान्यांचे दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या मुलांनी केलेल्या वेशभूषांनी सार्यांचे लक्ष वेधले. राजापूर हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार सावंत याने जवाहर चौकामध्ये भारदस्त आवाजामध्ये पोवाडा गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सार्यांसमोर उभा केला.
ओणी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, सुप्रभा सहकारी पतसंस्था आणि सुप्रभा वाचनालय (कोंडिवळे) यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस रंगणार्या या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आज सकाळी ओणी बाजारपेठ, तर सायंकाळी राजापूर शहर बाजारपेठेमध्ये ग्रंथदिंडी काढून जनजागृती करण्यात आली.
या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाचे स्वागताध्यक्ष वासुदेव तुळसणकर, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, प्रसिद्ध बालसाहित्यिक मदन हजेरी, संयोजन समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार, उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. छाया जोशी, अभय मेळेकर, सतीश रहाटे, जगदीश पवार, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, गुरुदत्त खानविलकर, प्रवीण नागरेकर, एकनाथ मोंडे, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, संदीप देशपांडे, पांडुरंग भाटकर, नारायण शेलार, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद गोसावी, संस्था संचालक गणपत भारती, नारायण आंग्रे, संतोष वडवलकर, विजयकुमार वागळे, रामचंद्र तुळसणकर, नामदेव तुळसणकर, विश्वनाथ वडवलकर, अनंत नागम, मुख्याध्यापक तानाजी शिंदे, पर्यवेक्षक विनोद मिरगुले, राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश भालशंकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रामध्ये ओणी येथे सुप्रभा वाचनालय, कोंडिवळे -बाजारपेठ-ओणी हायस्कूल अशा काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये ओणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारा बलुतेदार, संत, छत्रपती शिवाजी महाराज भारत माता यांची वेषभूषा केली होती. वडवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक त्यात सहभागी झाले होते. सायंकाळी राजापूर शहरामध्ये काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये राजापूर हायस्कूलसह गुजराळी शाळा, विश्वनाथ विद्यालय यांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा, संत, छत्रपती शिवाजी महाराज, शेतकरी आदींच्या वेषभूषा केल्या होत्या. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थांच्या चेहर्यावर आपण सादर केलेल्या वेषभूषेच्या भावमुद्रा आनंद सांगून जात होत्या. यावेळी पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.