
बेमुदत संपामध्ये अध्यापक संघही सहभागी होणार
रत्नागिरी: राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्यावतीने १४ डिसेंबरपासून राज्यात बेमुदत संप होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) सक्रिय सहभागी आहे. जिल्ह्यातील काही मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी त्यांच्या राज्य संघटनेचा आदेश नसल्याने संपामध्ये सहभागी होण्याबाबत संभ्रमाची अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर अध्यापक संघाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केले आहे.
राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्यावतीने जुनी पेन्शन सर्वांना सरसकट लागू करा, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील बहुतांशी शिक्षक संघटना या संपामध्ये सहभागी होत आहेत; परंतु अद्याप काही संघटनांच्या राज्य संघटनेकडून संपाबाबतची भूमिका स्पष्ट न झाल्याने काही मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये संपात सहभागी होण्याबाबत संभ्रमाची अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष व राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अध्यापक संघ व समन्वय समिती पूर्ण पाठीशी आहे. हा संप प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. त्यामुळे कोणताही किंतु-परंतु मनात न ठेवता जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये पूर्ण क्षमतेने सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.