
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतही प्रति वर्ष 5 लाखांचे आरोग्य संरक्षण
रत्नागिरी :राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता नव्या 328 उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आणखी 147 आजार वाढविणायत आले आहेत. त्यामुळे आता एकूण उपचार संख्या ही 1356 इतकी झाली आहे. त्यामळेे नागरिकांना देण्यात येणार्या आरोग्य सुविधांमध्ये समाविष्ठ आजारावरही उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे उपचार शासनाने जारी केलेल्या रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतही प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला मिळणार आहे.
शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यात 2 जुलै 2012 पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.5 लक्ष इतके आरोग्य संरक्षण देण्यात येत होते. त्या आरोग्य संरक्षणात आता वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर ही वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात 23 सप्टेंबर 2018 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. याच धर्तीवर आता राज्य सरकारनेही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ केली आहे. यानुसार आता प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला मिळणार आहे.