
वर्षभरात लाचलुचपतकडून नऊ तक्रारींची दखल
रत्नागिरी: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराच्या प्रकाराध्ये वाढच होताना दिसते आहे. गत वर्षी या विभागाकडे केवळ दोनच भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र यावर्षी फोन कॉल, तक्रारी अशा नऊ घटनांना आळा घालण्याचे काम लाचलुचपत विभागाने केले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत चव्हाण यांनी दिली.
सरत्या वर्षाचा आढावा घेताना चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराच्या प्रकार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. या घटना आळा घालण्यासाठी जनजागृती सप्ताहाचेही विभागाकडून आयोजन करण्यात येते. भ्रष्टाचार विषयी माहिती लोकांपर्यत देण्यात येते. जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची शहानिशा झाल्यावर संबंधित गुन्हेगार ज्या ठिकाणी असेल तेथे विभागाकडून सापळा रचून कारवाई केली जाते. या सापळा कारवाईत पथकासह त्या-त्या विभागाचे पंच देखील सहभागी असतात. गतवर्षी दोन गुन्हे दाखल झाले होते ते न्यायालयीन प्रविष्ट आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यातील रत्नागिरी-३, दापोली-२, चिपळूण-१ खेड-१, देवरुख-१ संगमेश्वर-१ अशा नऊ गुन्हे लाच लुचपत विभागाकडे दाखल झाले आहे. नऊ गुन्ह्यात एक गुन्हा मागणीचा गुन्हा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ऑफिस टोल फ्री क्रमांक, स्वतः तक्रारदार आणि जुने तक्रारदार अशा माध्यमातून विभागाकडे तक्रारी दाखल होतात. यामध्ये तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. टोल फ्री क्रमांक १०६४ वर नेहमी ५० मॅसेज- फोन कॉल येत असतात. त्याची तपासणी केली जाते. मात्र टोल फ्री क्रमांकावर आलेला कॉल काही वेळा इतर विभागाकडचाही असतो जसे पोलिस ठाण्याचा. त्यावेळी त्या तक्रारदाराला त्यांची योग्य ती माहिती कार्यालयाकडून देण्यात येते. दरवर्षी कार्यालयाकडून ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालवधीत जनजागृती सप्ताह घेतला जातो. सर्वसामन्य जनता, शिबिर, तसेच कॉलेज महाविद्यालयात भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीही केली जाते. यावर्षी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकाऱी यांच्यावर विभागातर्फे कारवाई करुन गुन्हे जिल्हा न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले आहेत.