
कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील
राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची घोषणा
रत्नागिरी:- महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या कोकण विभागीय सचिव पदी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या रत्नागिरी येथे झालेल्या सभेमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल, नाशिक जिल्हा टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष मोरे सर, सिंधुदुर्ग जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष अजय शिंदे , रत्नागिरी जिल्हा टीडीएफचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते, सचिव रोहित जाधव, कायदेशीर सल्लागार आत्माराम मिस्त्री यांच्यासह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची कोकण विभागीय बैठक नुकतीच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मध्ये संपन्न झाली. राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी विषय पत्रिकेवरील विषयानुसार सभेची सुरुवात केली.यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात तसेच कोकण विभागांमध्ये टीडीएफची बांधणी अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.सध्या कोकण विभागीय टीडीएफच्या अध्यक्षपदी नरसू पाटील कार्यरत असून सचिव पदी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण सभागृहाने एकमताने केली. सिंधुदुर्ग टीडीएफ चे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे , महिला प्रमुख ईशा पेडणेकर यांनी सभागृहाच्या सूचनेला अनुमोदन दिले. गिरीश पाटील, सुशांत कविस्कर यासह अनेक उपस्थित सभासदांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रत्नागिरी टीडीएफ चे उपाध्यक्ष संतोष हजारे, सुनील मेटकरी, अर्चिता कोकाटे यासह सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिव व पतपेढीचे संचालक उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष माजी आमदार बोरस्ते यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये पदवीधर निवडणुकी संदर्भात राज्य संघटनेची भूमिका सविस्तरपणे मांडली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना 14 डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपामध्ये सर्व क्षमतेने उतरण्याचे आवाहन केले. कोकण विभागीय टीडीएफच्या सचिव पदी रत्नागिरी जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष सागर पाटील यांची अधिकृतपणे निवड केली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. सागर पाटील यांच्या निवडीबद्दल उपस्थित सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले. सभेचे सुत्रसंचलन रत्नागिरी टीडीएफ चे सचिव रोहित जाधव यांनी केले.