
स्थानिक बाजारपेठेत ८४ रुपयांची खरेदी करणाऱ्याला मिळाली एक लाखाची दुचाकी बक्षीस
रत्नागिरी : जास्तीत जास्त ग्राहकांना स्थानिक बाजरपेठेत खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दिवाळी निमित्ताने ‘खरेदीची महास्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या योजनेत सहभागी असलेल्या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या स्पर्धेत भाग घेता येत होता. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची १०० बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. यात दुचाकी, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, सायकल, स्मार्ट वॉच यांसारख्या आकर्षक बक्षिसांचा समावेश होता. सुमारे १० हजार ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी करून या योजनेचा लाभ घेतला. यामधून १०० भाग्यवान ग्राहकांची निवड करण्यात आली व त्यांच्यामध्ये बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयेश मंगल पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस समारंभात १०० ग्राहकांना या योजनेतील बखीसे देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जय मेट्रो मेडीमॉल मधून ८४ रुपयांची खरेदी करणारे ग्राहक प्रशांत गोठणकर यांना मिळाले आहे. त्यांना अवघ्या ८४ रुपयांच्या खरेदीवर एक लाखाची दुचाकी मिळाली आहे. या बक्षीस समारंभाला गांधी ऑटो एजन्सीजच्या संचालिका सौ स्मिता गांधी, बांधकाम व्यावसायिक विकीशेठ जैन यांच्यासह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संखेने उपस्थित होते.