
आंदोलनकर्त्या काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
रत्नागिरी :मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत तीन काळ्या कायद्यांविरोधात आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर जाळल्याप्रकरणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्यासह कॉंग्रेसच्या ३५ पदाधिकार्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कोरोनाचा काळ सुरू असतानाच केंद्र सरकारने तीन कायदे पारित केले. त्या विरोधात रत्नागिरीत कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते. केंद्र सरकारने पारित केले तिन्ही कायदे रद्द करा अशी मागणी खासदार राहुल गांधी यांनी उचलून धरली होती. तसेच उत्तर प्रदेश येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीत निदर्शने झाली होती.
यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनाई आदेश असतानादेखील गर्दी करून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील मुख्य गेटवर कॉंग्रेसचे आंदोलन सुरू असताना कार्यकर्त्यांनी रस्त्यात टायर जाळला. याप्रकरणी शहर पोलिसांनी कॉंग्रेसचे तत्कालीन निरीक्षक मनोज शिंदे, तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी आ. हुस्नबानू खलिफे, अशोक जाधव, रुपाली सावंत, कपिल नागवेकर, दीपक राऊत, गौस खतीब, अनिरूद्ध कांबळे, उदय पवार, हारिस शेकासन, अल्पेश मोरे, अविनाश लाड, अजमिरा शेख, रिझवाना शेख यांच्यासह ३५ जणांवर भांदविक १४३, १४७, १४९, ३४१, २८५, १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. सोमवारी त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आंदोलकांच्यावतीने ऍड. महेंद्र मांडवकर, ऍड. उमेश जोशी, ऍड. ममता मुद्राळे, ऍड. अश्विनी आगाशे यंानी बाजू मांडली.