शाळा सुरू होऊन दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
रत्नागिरी:शाळा सुरु होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी गणवेशाचा पत्ता नव्हता. जुन्याच गणवेशावर मुलांना शाळेत जावे लागत होते. आता मात्र सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश, स्काऊट गाईडचा गणवेश, बूट आणि दोन मोजे यासाठी शासनाकडून निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अडीच हजार शाळांमधील 75 हजार 169 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
पूर्वी सर्व मुली आणि विशिष्ट जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती. यासाठी जिल्हापरिषदेला 5 कोटी 78 लाख 80 हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये होते. अनेकवेळा काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्यही मिळत नाही. प्राथमिक शाळांची पटसंख्या कायम रहावी यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पूर्वी शासनाकडून मुली आणि एससी, एसटी संवर्गातील मुलांना गणवेशाचा लाभ दिला जात होता. यंदापासून सर्वच मुलांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या निकषानुसार 53 हजार 381 विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यामधून विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले.
नवीन निर्देशानुसार स्काऊट गाईडसाठीचा एक गणवेश, बूट आणि दोन मोजे यासाठी 470 रुपये प्रति विद्यार्थी मंजूर झाले आहेत. त्यासाठी सव्वा चार कोटी रुपये जिल्हापरिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामधून गणवेश आणि अन्य साहित्य खरेदी केले जाणार आहे. तशा सूचना शाळास्तरावर देण्यात आल्या असून, प्राप्त निधी तालुकास्तरावर पाठविण्यात आला आहे.