
चांदेराईत पूर ओसरला; जनजीवन पूर्वपदावर, भातशेतीच्या नुकसानीची शक्यता
रत्नागिरी ः मुसळधार पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पुराच्या पाणी तीव्रता किती होती हे पाणी ओसरल्यानंतर दिसून आले. ३६ तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पाणी ओसरले.
तालुक्याला दोन दिवस पावसाने झोडपून काढले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. बुधवारी सायंकाळी ६ वा. चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले ते शुक्रवारी (ता. २८) पहाटे ६ वा. बाजारपेठेतील पाणी ओसरले. चांदेराई बाजारपेठेतील लहान -मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली आहेत. चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे, हरचिरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचला आहे. चांदेराई पुलावरील कठडा तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला. रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
सोमेश्वर येथील मुस्लिम मोहल्ल्यातील काही घरांमध्ये पाणी गेले होते. येथील पाणीही गुरुवारी रात्री ओसरले. सोमेश्वर आणि काजरघाटी येथील पूर्ण शेती पाण्याखाली होती. या गावातील लावणीची कामे पूर्णत्वास गेली आहे. त्यानंतर गेले दोन दिवस येथील भातशेती पाण्याखाली असल्याने त्यावर काही ठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे येथील शेतीचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
