
कंत्राटी शिक्षकांना २० हजार रुपये मानधन द्या
आ. राजन साळवी यांच्या मार्फत अधिवेशनात पाठपुरावा
रत्नागिरी :जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त जागी नियुक्त झालेल्या प्रशिक्षित तरुणांना नवीन भरती होईपर्यंत कायम ठेवण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. अशा प्रशिक्षित शिक्षकांना शिक्षण विभागाने निर्धारित केलेले २० हजार रुपयांचे मासिक मानधन दिले पाहिजे. यासाठी जि. प. चे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. हे मानधन देण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेला सरकारकडून प्राप्त व्हावेत, यासाठी त्यांनी शिवसेनेचे आमदार राजन. साळवी यांना निवेदन देऊन अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पुरेसा शिक्षकवर्ग नाही. जिल्हा बदली मोठ्या प्रमाणात केल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा शून्य शिक्षकी आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांनी रिक्त जागांवर प्रशिक्षित डीएड्, बीएड् व पदवीधर तरुणांची नियुक्ती केली आहे. नियमित शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर ही नियुक्ती झाली असून त्यांच्याकडून अध्यापनाचे कामकाजही सुरू आहे. मात्र, असे असताना त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रकार घडला.
अध्यापनाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना नवीन भरती होण्यापूर्वीच कमी केले जाऊ नये, नियमित शिक्षक भरती होईपर्यंत त्यांनाच या अध्यापन कामात कायम ठेवले जावे, अशी विनंती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना नागले यांनी केली होती. त्यानुसार शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबत आ. राजन साळवी यांना निवेदन देऊन अधिवेशनात विषय मांडण्याची विनंती नागले यांनी केली आहे.