चांदेराई बाजारेपेठ अजूनही पुराच्या छायेखाली
रत्नागिरी:- काजळी नदीच्या पुरापासून चांदेराई बाजारेपेठेचे संरक्षण करण्यासाठी पात्रातील काढलेला गाळ किनार्यावरच साठवण्यात आला. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदी दुथडी भरुन वाहत असून किनार्यावरील गाळ वाहून गेला आहे.
घाट परिसरातून वाहत येणारी काजळी नदीचे पात्र गाळाने भरुन गेले आहे.
पावसाळ्यामध्ये पुरातून वाहत येणारी माती मोठमोठे दगडांच्या ठिकाणी साचून राहते. चांदेराई येथे असलेल्या धरणाच्या परिसरात तीच परिस्थिती निर्माण झाली होती. गाळ साचल्यामुळे दरवर्षी पूर आल्यामुळे किनार्यावरील बाजारपेठेतील व्यावसायीकांचे मोठे नुकसान होत होते. स्थानिक लोकांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर केला. गेली दोन वर्षे या परिसरातील गाळ काढण्याचे काम सुरु होते. मे महिन्यामध्ये सुमारे 900 मीटर लांबीच्या परिसरातील गाळ काढण्यात आला. सुमारे दहा फुटाहून अधिक खोलीतील गाळ काढण्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले. नदीपात्रातील काढलेला गाळ किनार्यावरच साठवून ठेवण्यात आला होता. याबाबत माजी उपसरपंच दादा दळी यांनी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन गाळ दुरवर टाकण्याची सुचना केली होती. पण तसे झाले नाही. गतवर्षी चांदेराई बाजापेरठवासीयांना पुरपरिस्थितीला सामना करावा लागला नव्हता. यंदा तेवढा पाऊसच झालेला नसल्याने अजुनही पुरपरिस्थिती उद्भवलेली नाही. दोन दिवसांपुर्वी घाटामध्ये पडलेल्या पावसामुळे काजळी नदी इशारा पातळीवर वाहत होती. परंतु पाणी बाजारपेठेत शिरलेले नाही. तरीही किनार्यावर ठेवलेला गाळ हळूहळू पाण्याबरोबर वाहून गेला आहे. हा गाळ पुन्हा नदीपात्रात साचून राहणार आहे. यावर झालेला खर्च वाया गेला आहे. काढलेल्या पैकी सुमारे पन्नास टक्के गाळ वाहून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे.