
निवृत्तीवेतन धारकांच्या सेवेसाठी कटिबध्द :जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे
रत्नागिरी :- जिल्हा कोषागार कार्यालय निवृत्तीवेतन धारकाच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असेल, असे मार्गदर्शन जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे यांनी केले.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत अल्पबचत सभागृहात जिल्हा व तालुक्यातील निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला निवृत्तीवेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याला जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकूंद खांडेकर, अप्पर कोषागार अधिकारी रविंद्र मोरे, निवृत्तीवेतन शाखेच्या अपर कोषागार अधिकारी एम.एम. जगदाळे, ॲक्सिस बँकेचे प्रतिनिधी निलेश पाटील, निवृत्ती वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष वसंत झगडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
मेळाव्यात निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन व त्या अनुषंगाने वेळोवेळी लागू होणारे इतर लाभ इत्यादी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून तत्परतेने करण्यात आले. निवृत्ती वेतन धारकांना बँकेबाबत उदभवणाऱ्या अडचणी बँकेच्या प्रतिनिधी समोर मांडण्यात आल्या व बँकेच्या सहकार्याबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बँकेकडून निवृत्तीवेतनधारकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतधारकांना मिळणाऱ्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल निवृत्तीवेतनधारक संघटनेतर्फे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे व अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कोषागार अधिकारी शिवनाथ चन्ने यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन निवृत्ती वेतन शाखेतील कर्मचारी महादेव मोहिते, मयुरी मुजूमदार, संगिता कवाळे, नम्रता चौघुले, सीमा शिवलकर, संतोष मांजरेकर, वैभव ठोंबरे, श्री. सावंत, श्री. तडवी, श्री. रसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन जाई मयेकर यांनी केले.
मेळाव्याला यावेळी जिल्हयातील व तालुक्यातील निवृत्ती वेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
