
कोकणातील कातळ खोद चित्रांना मिळणार वैश्विक मूल्य
रत्नागिरी, सिंधुदुर्गतील 8 प्रस्तावाला युनेस्कोची प्राथमिक मान्यता
रत्नागिरी | प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात कोकण प्रांतातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिमानवाचा इतिहास उलगडणारी कातळ खोद चित्र अर्थात स्थानिक भाषेत ओळखली जाणारी कातळशिल्प मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. कोकणातील अश्मयुगीन कालखंडावर आणि एकूणच मानव जातीच्या कलात्मक उत्क्रांतीवर प्रकाश झोत टाकणारी ही कातळ खोद चित्र मानव जातीचा खूप मोठा वारसा ठेवा आहे. या कातळ खोद चित्रांना वैश्विक मूल्य आहे. या वारसा ठेव्याला जागतिक स्तरावर दर्जा मिळावा म्हणून भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून 8 व गोवा राज्यातील 1 असे एकूण नऊ गावांचा प्रस्ताव युनेस्को कडे पाठवण्यात आला होता त्यास युनेस्कोने प्राथमिक मान्यता दिली आहे अशी माहिती या कातळ खोद शिल्पाचे संशोधक भाई रिसबूड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या आणि भारत देशाच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. युनेस्को कडून अंतिम मान्यता मिळण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी राज्य शासनातर्फे क्रिएटिव्ह फूट प्रिंट्स, दिल्ली, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी, तेजस्विनी आफळे असोसिएट पुणे, व बायोम पुणे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या वतीने या संस्थां मार्फत अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तसेच कातळ खोद चित्रांचे पुरातत्वीय महत्त्व ओळखून सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी कातळ खोद चित्र परिसर संरक्षित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 17 गावांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. (यादी सोबत जोडण्यात आली आहे.) या प्रस्तावाची विशेष बाब म्हणजे कातळ खोद चित्र ज्या जागेमध्ये आहेत त्या जागेच्या मालकांचे मालकी तत्व अबाधित ठेवून संबंधित खोद चित्र संरक्षित केली जाणार आहेत. या संरक्षणाच्या कामात नियम व अटींच्या अधीन राहून संबंधित खोद चित्रांभोवती संरक्षित भिंत खोद चित्र पाहण्यासाठी येणारे पर्यटक, अभ्यासक यांच्या सोयीसाठी एक लहानसे माहिती केंद्र तसेच काही ठिकाणी स्वच्छतागृह अशा प्राथमिक बाबींचा समावेश आहे. यासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे वारसा ठेवा जतानासाठी उचललेले अत्यंत सकारात्मक असे पाऊल आहे.
आपल्या देशाचा अमूल्य वारसा ठेव्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी, त्यांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे.
डॉ. तेजस म. गर्गे
संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय,
महाराष्ट्र शासन
मुंबई
युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत दाखल करण्यात आलेली कोंकणातील खोद चित्र ठिकाणे —
रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी तालुका – ऊक्षी, जांभरूण ( एकंदर ठिकाणे 2)
राजापूर तालुका – कशेळी, रुंढे, देविहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे ( एकंदर ठिकाणे 5)
सिंधुदुर्ग जिल्हा
मालवण तालुका – कुडोपी ( एकंदर ठिकाणे 1)
गोवा
फणसाईमाळ ( एकंदर ठिकाणे 1)
सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र शासनातर्फे कातळ खोद चित्र ठिकाणे परिसर संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित केलेली पहिल्या टप्यातील ठिकाणे —
भगवती नगर, चवे, देऊड, ऊक्षी, ऊक्षी (2), निवळी गावडे वाडी, कापडगाव, उमरे, कोळंबे, कशेळी, रुंढे, देविहासोळ, बारसू, गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव