
भर रस्त्यात फर्निचर विकणार्यांवर रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई
रत्नागिरी:- शहरात कर भरुन व्यापारी वर्ग आपला व्यवसाय करीत असताना अनेकजण बिनदास्तपणे रस्त्यावर आपला माल विकताना दिसत आहेत. मंगळवारी जेलरोडच्या उतारात सोफासेट व फर्निचर सामान विकणार्या परप्रांतीय व्यापार्यांवर नगर परिषदेने कारवाई केली. माजी नगरसेवक निमेश नायर यांनी पुढाकार घेतल्याने ही कारवाई झाल्याने, व्यापार्यांनी समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी शहरामध्ये अनेकजण हातखंब्यापासून रत्नागिरी एसटीस्टॅण्ड, आठवडाबाजारपर्यंत रस्त्यावर बसून व्यापार करीत आहेत. काहींनी तर बिनधास्तपणे नर्सर्या, फर्निचर साहित्य ठेवून व्यवसाय सुरु केला आहे. मंगळवारी जेलरोडच्या उतारामध्ये आकर्षक असे सोफसेट विक्री करण्यासाठी ठेवण्यात आले होते. अत्यंत माफक दरात हे सोफासेट विकले जात होते. त्यामुळे त्याच्या किंमती काढण्यासाठी व विकत घेण्यासाठीही गर्दी होत होती. हा प्रकार शहरातील काही व्यापार्यांच्या निदर्शनास आला. काहींनी नगर पालिका प्रशासनालाही याची कल्पना दिली. मात्र दुपारपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई नगर पालिकेने केली नव्हती. त्यामुळे व्यापार्यांनी हा प्रकार माजी नगरसेवक निमेश नायर यांच्या कानावर घातला. नायर स्वत: रस्त्यावर उतरुन, त्यांनी नगर पालिका अधिकार्यांना बोलावून घेतले. नगर पालिका प्रशासनाने सोफासेट ताब्यात घेतले. माजी नगरसेवक निमेश नायर यांनी दाखवलेल्या या सतर्कतेबद्दल व्यापार्यांनी त्यांचे आभार मानले. मात्र व्यापारी नगर पालिकेला मोठ्याप्रमाणात कर देत असतानाही बिनदिक्कतपणे फर्निचर विक्रीचे स्टॉल लागतात कसे, असा प्रश्नही स्थानिक व्यापार्यांनी उपस्थित केला.