
“खल्वायन” गुढीपाडवा विशेष संगीत मैफल
“अभंग नाट्यरंग” कार्यक्रमाने रंगणार
रत्नागिरी:- खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ (गुढीपाडवा) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालय, पर्याची आळी, बाजारपेठ रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून, सदरहू मैफलीत देवगड ची उदयोन्मुख युवा गायिका कु. सावनी प्रसाद शेवडे व चिपळूणचा प्रसिद्ध युवा गायक श्री.वरद केळकर यांच्या “अभंग नाट्यरंग” कार्यक्रमाने सदरहू मैफल रंगणार आहे. या मैफलीला मे.फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे प्रायोजकत्व लाभले असून, सदरहू मैफल सर्व संगीत रसिकांकरीता विनाशुल्क आहे.
कु. सावनी हिचे गायनाचे सुरवातीचे शिक्षण तिचे वडील व गुरु श्री. प्रसाद शेवडे यांच्याकडे झाले. त्यानंतर सौ.राधा जोशी व श्री. स्वप्नील गोरे यांच्याकडून त्यांना गायनाचे मार्गदर्शन मिळाले. सध्या पुणे येथील विदुषी शाल्मली जोशी यांचेकडून ती शास्त्रीय गायनाचे पुढील शिक्षण घेत आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची विशारद प्रथम ही परीक्षा ती उत्तीर्ण आहे. जिल्हास्तरीय सुगम संगीत व नाट्य गीत स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धा मध्ये तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०२२ साली गानवर्धन व स्वरमयी गुरुकुल आयोजित स्वरप्रभा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला पदमविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे हस्ते विशेष उल्लेखनीय पारितोषिक देवून गौरवण्यात आले होते. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत तिने संगीत सौभद्र या नाटकातून आपले अभिनय व गायन कौशल्य दाखवले होते .
कु.वरद केळकर हा चिपळूणचा प्रसिद्ध गायक कलाकार असून , तेथील प्रसिद्ध गायक व मार्गदर्शक श्री. राजाभाऊ शेंबेकर यांचेकडून तो १५ वर्षे गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. तसेच आकाशवाणी रत्नागिरी चे प्रसिद्ध गायक श्री. प्रसाद गुळवणी यांचेकडूनही गेली ५ वर्षे तो जयपूर घराणे गायकीचे शिक्षण घेत आहे. आकाशवाणी ची गायनासाठी बी ग्रेड त्याला प्राप्त आहे.
या कार्यक्रमाला चिपळूणचेच प्रसिद्ध युवा वादक श्री. प्रथमेश देवधर (तबला साथ) व श्री. अमित ओक (ऑर्गन साथ) करणार आहेत. प्रथमेश यांचे तबल्यातील सुरवातीचे शिक्षण श्री महेशकुमार देशपांडे यांचेकडे व पुढील शिक्षण पुणे येथे पं. विवेक जोशी व पं. संजय करंदीकर यांचेकडे चालू आहे. आकाशवाणीची बी ग्रेड त्याला प्राप्त आहे. भरत नाट्य मंदिर पुणे या संस्थेच्या काही संगीत नाटकांना त्याने साथसंगत केलेली आहे.
श्री. अमित ओक हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटट असून, हार्मोनियम वादनात त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे. अनेक नामवंत गायकांना त्यांनी विविध संगीत महोत्सवातून हार्मोनियमची साथसंगत केलेली आहे.
सदरहू कार्यक्रमाच्या निवेदनाची बाजू श्री. प्रदीप तेंडुलकर हे सांभाळणार आहेत.
सदरहू गुढीपाडवा मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क असून, कार्यक्रमाचा आस्वाद सर्व संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.