संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त कर्मचाऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन
रत्नागिरी:- (जमीर खलफे)
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरात सर्वत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन केले. रत्नागिरीतील संपात उतरलेल्या शासकीय कर्मचारी यांनीही रत्नागिरीत थाळीनाद आंदोलन केले. सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प झालेले असतानाही शासन दुर्लक्ष करीत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतापलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करीत शासनाचा निषेध केला.
सलग सातव्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे. असे असतानाही पेन्शन सह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागांतील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा, कामगार कायद्यातील जाचक बदल तत्काळ रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे. या संपामुळे शासकीय कारभार ठप्प झाल्याने सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.