कोकणात ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
रत्नागिरी :वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यात राबविलेल्या तीन दिवसांच्या विशेष मोहिमेत कोकण प्रादेशिक विभागात वीज चोरीची ५३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. राज्यभरातील चारही प्रादेशिक विभागांतून एकूण २५० प्रकरणे पकडण्यात आली असून, या कारवाईत तब्बल ६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणच्या भरारी पथकांकडून कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रांमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक ७३, नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६ आणि कोकण विभागात ५३ अशी एकूण २५० वीजचोरी व अनधिकृत वीज वापराची प्रकरणे समोर आली आहेत. उघड झालेल्या वीजचोरीचे मूल्यांकन करून संबंधित ग्राहकांना ६ कोटी २७ लाख रुपयांची देयके बजावण्यात आली आहेत.
या मोहिमेत २४० ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरीची, तर दोघांविरुद्ध कलम १२६ नुसार अनधिकृत वीज वापराची कारवाई करण्यात आली आहे. विहित मुदतीत वीजचोरीचे देयक आणि दंडाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची कसून तपासणी सुरू आहे. ग्राहकांनी अनधिकृत मार्ग न अवलंबता अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.