ITI च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी; अथर्व आणि श्रावणी देशात अव्वल! भाजपाच्या वतीने करण्यात आला सत्कार.
रत्नागिरी: येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (ITI) देशपातळीवर आपला झेंडा फडकवला आहे. रत्नागिरीतील दोन विद्यार्थ्यांनी आपापल्या व्यवसाय अभ्यासक्रमात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर पदाधिकारी यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार केला आहे. अथर्व नागवेकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी. त्याने 'कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट' (COPA) या अभ्यासक्रमात देशात आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर श्रावणी चव्हाण राणी लक्ष्मीबाई महिलांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी. तिने 'फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसर' (फळे व भाजीपाला प्रक्रिया) या व्यवसायात देशात आणि राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. या दोघांच्या यशामागे त्यांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि प्रशिक्षक सचिन कुलकर्णी व मीनल दळी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले गट निदेशक, दोन्ही संस्थांचे प्राचार्य आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्यही आम्हाला मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. या दोन विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व यशामुळे रत्नागिरीच्या ITI चा नावलौकिक देशपातळीवर झाला आहे. या यशाबद्दल दोघांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारती जनता पार्टीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, निलेश आखाडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शेखर लेले, भक्ती दळी,शैलेश बेर्डे, मंदार भोळे, सायली बेर्डे, शमी हरचेकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.