१७० शिक्षकांची ‘राज्यस्तरीय आयडॉल’ म्हणून निवड
रत्नागिरी जिल्ह्यातील ५०२ प्रस्तावांतून झाली अंतिम छाननी
रत्नागिरी:
राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा स्तरावरून तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी १७० उपक्रमशील शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून अधिकृत निवड झाली आहे.
राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रामुख्याने दीक्षा अॅप आणि ई-कंटेन्ट निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरावर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे शिक्षक, प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनात कमी खर्चातील किंवा विनामूल्य शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर करणारे प्रयोगशील शिक्षक, तसेच सामाजिक सहभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणून शाळा समृद्ध करणाऱ्या शिक्षकांची चाचपणी करण्यात आली.
५०२ शिक्षकांचे प्रस्ताव केले होते सादर
या निवडीबाबत माहिती देताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर म्हणाले, रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील ५०२ उपक्रमशील शिक्षकांच्या नावांची शिफारस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे केली होती. त्या प्राप्त प्रस्तावांची सूक्ष्म छाननी आणि मूल्यांकनानंतर राज्य परिषदेने १७० शिक्षकांची अंतिम निवड जाहीर केली. या निवडीची अधिकृत यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या या सर्व १७० आयडॉल शिक्षकांच्या माध्यमातून राज्यभरातील इतर शिक्षकांसाठी कार्यशाळा, ई-साहित्य निर्मिती आणि शैक्षणिक प्रयोगशीलतेचे धडे दिले जाणार आहेत.