कौटुंबिक वादातून जालगाव येथील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
दापोली: तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
सचिन तुकाराम शिंदे (वय ४८, रा. जालगाव चोरगेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सचिन शिंदे हे कोणताही कामधंदा करत नव्हते आणि त्यांना दारूचे तीव्र व्यसन होते. दारू पिण्यासाठी ते वारंवार आपल्या पत्नीकडे पैशांची मागणी करत असत. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार किरकोळ वाद आणि भांडणे होत असत.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी रात्री २:४५ वाजताच्या सुमारास सचिन शिंदे यांनी राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून घेतला. पत्नीला ते लटकलेल्या स्थितीत दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. उपस्थितांच्या मदतीने त्यांना गळफासावरून खाली उतरवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आमू. क्रमांक ८३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.