‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
‘आम्ही सिद्ध लेखिका’ कोकण विभागाचा उपक्रम
रत्नागिरी:
‘आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग’ यांच्या वतीने आयोजित ‘माणिकमोती’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आणि नवरात्रोत्सव येथील पंडित अ. के. देसाई हायस्कूलच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचे हे सलग तिसरे वर्ष असून, याद्वारे कोकण विभागातील लेखिकांच्या साहित्यिक व कलात्मक गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
या विशेष दिवाळी अंकात संस्थेच्या सदस्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, वैचारिक लेख, प्रवासवर्णने, कवितांचे रसग्रहण, विविध पाककृती तसेच त्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या छायाचित्रांचा समावेश आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम साधणारा हा अंक लेखिकांच्या सर्जनशीलतेची साक्ष देतो.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. शाळेच्या निवृत्त शिक्षिका, लेखिका व कवयित्री सौ. समिधा बाष्टे उपस्थित होत्या. सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविकात कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर कोकण विभागप्रमुख सौ. सुनेत्रा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. तांत्रिक विभागप्रमुख सौ. उमा जोशी यांनी या अंकाची निर्मिती प्रक्रिया उपस्थितांसमोर मांडली.
आपल्या मनोगतात सौ. समिधा बाष्टे म्हणाल्या, “डिजिटल युगातही वाचन आणि लेखनातील सातत्य टिकवून ठेवत सलग तीन वर्षे असा दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणे ही कौतुकास्पद बाब आहे.” त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत लेखिकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिवाळी अंक प्रकाशनासोबतच नवरात्राचे औचित्य साधून देवी आणि नवरात्रोत्सवावर आधारित विशेष कविता, गीते आणि पारंपरिक गोंधळाचे सादरीकरण करण्यात आले. या कलाविष्कारामुळे कार्यक्रमात साहित्यिक व सांस्कृतिक रंगत भरली.
या सोहळ्यास अर्चना देवधर, कुंदा बापट, राधिका आठल्ये, उमा देवळे, लता जोशी, शमा प्रभुदेसाई, विशाखा पाटोळे, मनीषा पटवर्धन, गौरी थत्ते, चित्रा गोस्वामी व डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्यासह संस्थेच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विशाखा पाटोळे यांनी केले, तर उमा जोशी यांनी आभार मानले.