पाचल येथे अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी जखमी
पोलिसांकडून ६,५०० रुपयांचा दंड*
पाचल :10 ऑक्टोबर (वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलचा विद्यार्थी आयाज नदीम प्रभुळकर (वय १४) हा शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घराकडे जात असताना तळवडे येथील १७ वर्षीय अल्पवयीन दुचाकीचालक श्रेयस सत्यवान नार्वेकर याने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात शाळकरी विद्यार्थी आयाज हा जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाटगे व पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधितावर तत्पर कारवाई केली. पोलिसांनी अल्पवयीन चालकावर विनापरवाना (लायसन्स नसणे) वाहन चालवणे, हेल्मेट नसणे आणि पीयूसी नसणे या विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघनाखाली तब्बल ६ हजार ५०० रुपयांचा दंडात्मक बडगा उगारला आहे.
पाचल हायस्कूल व परिसरामध्ये अनेकदा अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुण सुसाट वेगाने दुचाकी पळवत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शाळेकडून पालकांना वारंवार सूचना देऊन आणि धोक्याची जाणीव करून देऊनही अनेक पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात थेट दुचाकी सोपवली आहे. परिणामी, विनापरवाना गाड्या पळवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आणि बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या अपघातांना आणि बेफाम वाहनचालकांना वेळीच वेसण घालण्यासाठी पोलिसांनी अशा विनापरवाना व अल्पवयीन दुचाकीस्वारांवर नियमित आणि कडक दंडात्मक मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास यांनी केली आहे