गुहागर, लांजा येथून दोघांचे अपहरण
पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याप्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यातील आबलोली येथून एका ७२ वर्षीय वृद्धाचे, तर लांजा येथील दर्गा रोड परिसरातून एका ३५ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथून गणपत बाबाजी निवाते (वय ७२, मूळ रा. खोडदे निवातेवाडी, सध्या रा. आबलोली, ता. गुहागर) हे ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. नातेवाइकांनी व स्थानिक परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने गैरकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याची खात्री झाल्याने त्यांचे भाऊ, निवृत्त शिक्षक तुकाराम बाबाजी निवाते (वय ६०) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये (गु.र.नं. १०३/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत लांजा येथील दर्गा रोड परिसरातून ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास प्रविण दत्ताराम तावडे (वय ३५, रा. गोविळ गोसावीवाडी, ता. लांजा) हे बेपत्ता झाले आहेत.
कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांना कोणतीही संमती नसताना फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद त्यांची पत्नी प्रांजल प्रविण तावडे (वय ३४) यांनी दिली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी रात्री २३:२९ वाजता अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये (गु.र.नं. २६३/२०२६) गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी अज्ञात आरोपींचा आणि अपहरित व्यक्तींचा कसून शोध घेत आहेत.