रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली
नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा
रत्नागिरी : ‘एल निनो’चा वाढता प्रभाव आणि भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता शहरात पाणी कपात करणे अटळ झाले आहे. त्यामुळे दर सोमवारी पाणीकपात करावी, असे पालिकेच्या विचाराधीन आहे. याबाबत एकमत झाले नसले तरी कपातीवर लवकरच निर्णय होणार आहे. अनधिकृत जोडण्या तोडणे आणि रॅम्पला पालिकेच्या जोडणीचे पाणी बंद करण्याबाबतही चर्चा झाली.
सभेत होणाऱ्या ठरावांवर ठोस कारवाई केली जात नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तेच विषय परत परत येत असतील तर सभा कशाला घ्यायच्या? अशी आगपाखड सत्ताधाऱ्यांनी करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पालिकेची आजची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे, सर्व सभापती, नगरसेवक आणि खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा सुर्वे म्हणाल्या, “यंदा गणेश विसर्जनानंतर मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती लागल्या. त्यांचे दुसऱ्या दिवशी मांडवीतील तरुणांनी नगरसेवक बंटी कीर यांच्यासोबत पुन्हा विसर्जन केले. याबद्दल सभागृहाने आभार मानले.”
पाणी सभापती निमेश नायर यांनी दुष्काळसदृश स्थितीचे गांभीर्य विशद केले. कमी पाऊस पडल्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी दर सोमवारी आपण पाणीकपातीचा निर्णय घ्यावा असे मला वाटते, असे नायर यांनी सांगितले. तेव्हा तिवरेकर म्हणाले, “आपण दरदिवशी १० मिनिटांची कपात केली तर लोकांना कपातीचा त्रास होणार नाही आणि पाणीही मिळेल; मात्र यावर फक्त चर्चा झाली.”