एकाच दिवसात 6 अमली पदार्थ तस्कर हद्दपार
एनडीपीएस अंतर्गत प्रांताधिकारी जीवन देसाईंची धडक कारवाई
रत्नागिरी:
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करी आणि विक्रीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा अधिक घट्ट केला आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत सहा जणांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर या सहा जणांवर एकाच दिवशी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभाग असणाऱ्या आणि युवा पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या समाजकंटकांवर ही कडक कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासन गेल्या काही काळापासून आक्रमक भूमिकेत आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २०२३ पासून अमली पदार्थ विरोधी मोहिमेला विशेष गती दिली असून, आजअखेर त्यांनी या कायद्यान्वये तब्बल २१ जणांना जिल्ह्याच्या हद्दीतून पार केले आहे. एकाच दिवसात सहा जणांवर झालेली ही कारवाई आजवरची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आगामी काळातही अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या या आक्रमक आणि धडक निर्णयाचे जिल्ह्यातील सुजाण नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.