चिपळूण न.प.त अनुकंपा भरतीसाठी १५ लाखांची मागणी?
सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकाचा आरोप; प्रशासनाकडून इन्कार
चिपळूण: नगरपालिकेतील महिला सफाई कामगाराकडून अनुकंपा तत्त्वावर तिच्या नातेवाइकाची भरती होण्यासाठी मध्यस्थीने १५ लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा थेट आरोप सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक संदीप भिसे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात जोरदार खळबळ उडाली. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा प्रशासनाकडून इन्कार करण्यात आला.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक वर्षे शिपाई पदावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच भाजपचे नगरसेवक भिसे यांनी अनुकंप तत्त्वावर नोकरीवर घेताना काही मध्यस्थी पैशांची मागणी करत असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे.
नगरपालिकेत अनेक वर्षे सफाई कामगार असलेल्या महिलेने अनुकंप तत्त्वाखाली मुलाला कामावर घेण्यासाठी अर्ज केला असताना मध्यस्थीने तिच्याकडे १५ लाखांची मागणी केली. अन्यथा, आम्ही २५ हजार देतो, तुम्ही त्यासाठी सही द्यायची असा उलट प्रस्तावदेखील त्यांच्या समोर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप भिसे यांनी केला. यावर कॉंग्रेसचे नगरसेवक साजीद सरगुरोह यांनी हा देखील गंभीर विषय असून, पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव उघड करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी असा कोणताही प्रकार प्रशासनाकडून घडलेला नाही. नियमानुसार व पारदर्शकतेने याविषयाची प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले.
ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना पाणी पुरवठा अभियंता ओंकार भूरण यांनी सांगितले की, या योजनेसाठी नेमलेली एजन्सी बदलण्यात आली आहे. त्याप्रमाणे या कामासाठी संबंधित एजन्सीला डिसेंबर २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा ठराव करण्यात आला.
अनामत रक्कम देण्याचा प्रस्ताव
सभेत अनेक वर्षे रखडलेल्या मटण व मच्छी मार्केट इमारतीच्या ठेकेदारास अंतिम देयक व अनामत रक्कम देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी काही नगरसेवकांनी काम पूर्ण केले नसताना अनामत रक्कम कोणत्या आधारे द्यायची असा मुद्दा मांडला. मात्र, प्रशासनाने २०१८ मध्येच अनामत रक्कम परत देण्याबाबत केलेल्या ठरावाचा उल्लेख करत तसा अहवालही सादर केला. त्यानुसार संबंधित ठेकेदारास सदरची रक्कम अदा करण्याचे ठरले.