वाटद-खंडाळा येथे ‘जनहित फाउंडेशन’च्या कार्यालयाचा शुभारंभ; हजारो नागरिकांची उपस्थिती
रत्नागिरी : सर्वसामान्य, दुर्बल आणि पीडित नागरिकांच्या न्यायहक्कासाठी हक्काचे दालन उभे करण्याच्या उद्देशाने जनहित फाउंडेशनच्या कार्यालयाचा शुभारंभ शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी वाटद-खंडाळा, ता. रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
“विचारांचे सक्षमीकरण, जनहितासाठी समर्पण” या ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या पुढाकारातून जनहितासाठी सुरू झालेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॉलेज जीवनापासूनच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणे, नागरिकांच्या न्यायहक्कासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि वेळप्रसंगी संविधानिक पद्धतीने विविध आंदोलने उभारणे, या सामाजिक प्रवासाला आता जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून संघटित व्यासपीठ मिळाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करणे, प्रशासनाकडे योग्य पद्धतीने प्रश्न मांडणे आणि अन्यायाविरोधात संविधानिक व कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे, हा या कार्यालयाचा प्रमुख उद्देश राहणार आहे.
“अन्याय सहन करायचा नाही आणि अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने लढायचे,” या विचारातून जनहिताची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील आशेचा किरण म्हणून जनहित फाउंडेशनची ओळख निर्माण करण्यासोबतच, येणाऱ्या काळात अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी, संविधानिक मूल्यांची जाण असलेली आणि जनहितासाठी समर्पित अशी सक्षम पिढी घडविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जाणार आहे, अशी भूमिका प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी व्यक्त केली.
वाटद-खंडाळा येथून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे रत्नागिरी तालुक्यातील जनहिताच्या सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.