रत्नागिरीत पदवीधर शिक्षकांचा आक्रमक पवित्रा; भर पावसात धरणे आंदोलन करत प्रशासनाला धरले धारेवर
रत्नागिरी (प्रतिनिधी) :
एप्रिल २०२६ मधील अन्यायकारक पदवीधर समायोजन रद्द करणे, वेतनातील त्रुटी दूर करणे तसेच रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या धर्तीवर रत्नागिरीतही पदवीधरांचे समायोजन लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. खराब हवामानाची आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची कोणतीही पर्वा न करता शेकडो शिक्षकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता निर्णयानुसार पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर झालेले समायोजन, पवित्र पोर्टलद्वारे प्रसिद्ध झालेली विज्ञान आणि गणित विषयातील भरतीची जाहिरात आणि सातव्या वेतन आयोगातील त्रुटींच्या निवारणासाठी शिक्षक समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. असे असतानाही एकही शिक्षक मागे हटला नाही, उलट सर्वांनी छत्री उघडून गेटसमोर घोषणाबाजी सुरूच ठेवली. ‘आमच्या मागण्या मान्य करा’ आणि ‘घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा बुलंद घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलनानंतर शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैदेही रानाडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. “प्रशासन जर हे आंदोलन बेकायदेशीर म्हणत असेल, तर पदवीधरांचे झालेल समायोजन कायदेशीर आहे का? रायगड आणि सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही पदवीधरांचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत,” असा सवाल करत महाडकर यांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला. तसेच, लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात याहून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, तालुका नेते बबन साळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, राजेश भागणे, श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, संतोष बर्वे आदींसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.