सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस अडथळा ; दोन वाहन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, : शहरातील तेली आळी ते आठवडा बाजार जाणाऱ्या रस्त्यावर वाहन पार्क करुन वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ बाळू पिसाळ (वय ३८, रा. मुळ वाई ता. सातारा, सध्या आठवडाबाजार, रत्नागिरी) व वैभव रामचंद्र कदम (वय ३८, मुळ रा. भेलसाई ता. खेड, सध्या रा. खेर्डी, ता. चिपळूण, रत्नागिरी) अशी दोन संशयित वाहन चालकांची नावे आहेत. या घटना रविवारी (ता. २३) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास तेली आळी-आठवडाबाजार येथील रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित साईनाथ पिसाळ व वैभव कदम यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स बस सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अ़डथळा होईल अशा पार्क केल्या. या प्रकऱणी पोलिस हेड कॉन्स्टेबल कुशल हातिस्कर व पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील भातगाव (ता. गुहागर) येथील प्रौढ शहरातील गोखले नाका येथील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला. तेथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुनिल महादेव डिंगणकर (वय ४२, रा. मधलीवाडी भोबार, पाचेरीसडा-भातगाव, ता. गुहागर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुनिल डिंगणकर हे गोखले नाका येथे एका स्टोअरच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱी डॉ. श्रुती बोडके यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रखरणी सोनाली सुनिल डिंगणकर यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.